⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

अखेर चितोडा येथे झाली नालेसफाई : नागरिकांकडून समाधान व्यक्त

जळगाव लाईव्ह न्यूज । पावसाळा सुरु होण्याआधी नालेसफाई होणे गरजेचे असते. परंतु चितोडा (ता. यावल) येथे गेली दहा ते बारा वर्षांपासून नाले सफाई होत नसल्याने आरोड होत होती. मात्र यंदा प्रथमच पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई झाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गावातील अनेक ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात आली.

चितोडा येथे ग्रामपंचायतच्या हाकेच्या अंतरावर नाला आहे. हनुमान नगरला लागून हा नाला. या नाल्याला पावसाळ्यात शेती क्षेत्रासह डोंगर भागात पडणाऱ्या पावसामुळे पूर येतो. मागील काही काळापासून पूर आला नसला तरी यापूर्वी मोठ्या प्रमाणात पूर येऊन गेला आहे. पण भविष्यात पून्हा मोठ्या पुराची परिस्थिती ओढवून येऊ शकते.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नालेसफाईचं काम ग्रामपंचायतकडून करण्यात आलेली नाहीय. यामुळे अनेक काळापासून नाल्यात साचून असलेल्या पाण्यामुळे शेजारील नागरिकांचे आरोग्य धोक्यात तर होतेच पण नाल्यास साचून असलेल्या घाणीमुळे धोका अधिकचं वाढलेला होता. मात्र यंदा प्रथमच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. गावातील इतर ठिकाणीही साफसफाई जेसीबीच्या द्वारे करण्यात आली.