जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२५ । राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाऊन खराब झाली. ज्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला. दरम्यान सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली असली तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध निकष लावून शेतकऱ्यांना छळले जात असल्याचा आरोप शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना राबविताना सरकारने ज्या पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी न करता मदत केली त्याच पद्धतीने आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही पंचनामे न करता, तातडीने मदत करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. हे संवेदना नसलेले सरकार असून सर्व मंत्र्यांनी पूरस्थितीची पाहणी करा असे आदेश मुख्यमंत्र्यांना द्यावे लागतात हे दुर्दैव असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले..

राज्यात सध्या अनेक भागात पूर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांसह घरं, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने राज्य सरकारसह केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असल्याने केंद्राने स्वतः पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे.. असं एकनाथ खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या प्रमाणे जीआर काढून, कोणतीही कागदपत्रं न तपासता लाडक्या बहिणींना मदत केली, त्याच पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत करावी. सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे नुकसान झाल्याने कर्ज भरण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिली नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्ज माफीची घोषणा करावी अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी सरकारकडे केली.







