⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बालकावर कुत्र्याचा हल्ला; जीएमसीत झाले वेळेवर उपचार

बालकावर कुत्र्याचा हल्ला; जीएमसीत झाले वेळेवर उपचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील एका लहान मुलावर शनिवारी संध्याकाळी कुत्र्याने जबर हल्ला केला. त्यात त्याचा कान व चेहरा जखमी झाला. या अवस्थेत त्याच्यवर प्राथमिक उपचार झाले. मात्र इंजेक्शन कुठे मिळेना. अशावेळी मुलाच्या पालकांनी रविवारी २३ मे रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. अधिष्ठातांनी तात्काळ आपत्कालीन विभागात मुलाला दाखल करून घेत औषधोपचार केले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग (नेत्रकक्ष) येथे दररोज कुत्रा चावला म्हणून औषधोपचार करण्यासाठी रुग्ण येत आहेत. शनिवारी २२ मे रोजी कळमसरा येथे संध्याकाळी अंगणात खेळत असताना यश महेंद्र सोनवणे या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्याने आरडाओरड केल्यामुळे इतरांनी कुत्र्याला हाकलले. मात्र या हल्ल्यात मुलाच्या कानाला, चेहऱ्याला जबर जखम झाली. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार झाले. मात्र आवश्यक इंजेक्शन नसल्याने त्याच्या पालकांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना फोन करून मदत मागितली. त्यांनी तत्काळ त्याला होकार दिला.

दुपारी १. ३० वाजता यशला घेऊन त्याचे वडील महेंद्र सोनवणे व नातेवाईक अधिष्ठातांकडे आले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी तत्काळ त्याला आपत्कालीन कक्षात पाठवून इंजेक्शन उपलब्ध करून देत इतर औषधोपचार केले. त्यामुळे मुलाला दिलासा मिळाला. संध्याकाळी ५ वाजता अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी आपत्कालीन विभागात जाऊन बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. पालकांशी संवाद साधित धीर दिला. बालकावर वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे आभार मानले. मुलाच्या उपचारासाठी डॉ. अजय सोनवणे, डॉ. सतीश सुरळकर, डॉ.अश्विनी, परिचारिका यास्मिन शेख, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.