⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जाणून घ्या… जी.एस.ग्राउंडचे संपूर्ण नाव आणि इतिहास

जाणून घ्या… जी.एस.ग्राउंडचे संपूर्ण नाव आणि इतिहास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सर्वांना सुपरिचित असलेल्या जी.एस.ग्राऊंडचे नाव कसे आणि कशामुळे पडले आहे हे बऱ्याच जळगावकरांना माहिती नाही. जी.एस.चा अर्थच ठाऊक नसल्याने अनेकजण आपापल्या पद्धतीने अंदाज बांधत असतात. अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेले गोवर्धनदास सुंदरदास अग्रवाल यांनी शैक्षणिक कामासाठी १९१४ कडे ही जागा दान केली होती. गोवर्धनदास सुंदरदास अग्रवाल यांच्या नावामुळेच मैदानाला जी.एस.ग्राउंड असे ओळखतात. आज आपण पाहत असलेल्या जी.एस.ग्राउंडवर कधीकाळी शेतकी शाळा, वाणिज्य महाविद्यालय देखील होते हे आपल्याला माहितीच नाही. विशेष म्हणजे जी.एस.ग्राउंड मैदानाला शिवतीर्थ मैदान म्हणून देखील ओळखले जाते त्याची देखील वेगळी कहाणी आहे.

जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या समोर मोक्याच्या ठिकाणी असलेले मोकळे मैदान जी.एस.ग्राउंड म्हणून सर्वांना परिचित आहे. शहरातील प्रत्येक व्यक्तीने केव्हा ना केव्हा या मैदानावर फेरफटका मारलेला आहे किंवा त्याने हे मैदान बाहेरून का असेना पहिले आहे. जी.एस.ग्राउंड मैदानाला शिवतीर्थ मैदान म्हणून देखील संबोधले जाते. १९९५ नंतर शिवतीर्थ मैदान हे नाव पडले असले तरी आजही जी.एस.ग्राउंड हीच ओळख कायम आहे.

तब्बल २५ एकर जागा केली शिक्षणासाठी दान

जळगावात असलेल्या जी.एस.ग्राउंड मैदानाची जागा अमळनेर येथील गोवर्धनदास सुंदरदास अग्रवाल यांनी ‘ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पज’ म्हणून दान केली आहे. मैदानाची संपूर्ण जागा २५ हजार चौरस मीटर इतकी असून येथे ११ जून १९१४ साली जी.एस.ऍग्रीकल्चर म्हणून शाळा सुरु करण्यात आली होती. इमारतीच्या मागील बाजूस जिवंत पाण्याची विहीर असल्यामुळे ऍग्रीकल्चर शाखेला या विहिरीचा खूप फायदा होत होता. अवघ्या २३ वर्षात म्हणजेच सन १९३७ मध्ये हि शाळा बंद पडली आणि तिथेच जी.एस.कॉमर्स कॉलेज सुरु झाले. सुरुवातीच्या काळात महाविद्यालयाला उत्तम प्रतिसाद लाभत होता. अवघ्या काही काळात महाविद्यालय सुपरिचित झाले. परंतु १९३७ मध्ये सुरु झालेले कॉलेज १९६८ मध्ये बंद करण्यात आले.

तांत्रिक विद्यालय, कर्मचारी निवासस्थान आणि बरेच काही

महाविद्यालयाची वास्तू शासनाच्या ताब्यात असल्याने त्या कालावधीत इमारतीच्या बाजूला तांत्रिक विद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्यासोबतच त्याच मागे तांत्रिक विद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान देखील बांधण्यात आले आणि शेजारी शासकीय D.ed कॉलेज सुरु करण्यात आले. डी.एड कॉलेज २०१५ नंतर कुसूंबा शिवारात शासनाच्या जागेत वर्ग करण्यात आले. रस्त्यालाच लागून माजी सैनिकांचे वसतिगृह आणि त्याच बाजूला D.ed कर्मचाऱ्यांचे निवासस्थान तसेच DRDA ची इमारत इमारत उभी आहे. पूर्वी असणाऱ्या D.ed कॉलेजच्या जागेवर आता जिल्हा परिषद जळगाव तालुका पंचायत समिती कार्यालय उभे आहे.

तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरींनी केले होते शाळेचे उदघाटन

संपूर्ण मैदान आणि इमारत सन १९६२ साली जिल्हापरिषदेत वर्ग करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी निवासी पब्लिक स्कुल जि.प.विद्यालय म्हणून सुरु करण्यात आले. शाळेचे उदघाटन तत्त्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. याचसोबत इथे राहण्याची व जेवण्याची सोय देखील उत्तम होती. १९६९ ते १९७६ पर्यंत ही शाळा इथे व्यवस्थित सुरु होती व त्यानंतर शाळेचं रूपांतर सामान्य शाळेत करण्यात आले.

महाविद्यालय पडले बंद, आज फक्त शाळा सुरु

जी.एस.ग्राउंडच्या इमारतींमध्ये १९८५ पासून को-एज्युकेशन व ज्युनिअर कॉलेज ११ वी, १२ वी सुरु करण्यात आले होते. सन २०१० पर्यंत ते अगदी भरभराटीने सुरु होते आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद देखील उत्तम होता. शाळेला प्राथमिक विभाग १ ते ४ देखील सुरु होता. खासगी कॉलेज सुरु झाल्याने ११ वी व १२ वी सन १८-१९ मध्ये बंद पडले. आज तिथे फक्त ५ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. सध्या मैदानावर दिवसभर आणि विशेषतः अनेक तरुण, विद्यार्थी क्रिकेट किंवा इतर खेळांचा सराव करण्यासाठी येत असतात.

मनपा, महसूलचा कर अधिक मात्र जि.प.चे उत्पन्न कमी
जी.एस.ग्राउंड हे जिल्हा परिषदेच्या परवानगीने व्यापारी व बिनव्यापारी तत्वावर भाड्याने दिले जाते. महापालिकेकडून वर्षाला खुलाभूखंड कर १४ लाख तर महसूल विभाग हे वर्षाला ८ लाख आकारतात. एकूण २२ लाख रुपये केवळ कर मनपाला या मैदानाचा द्यावा लागतो. उत्पन्न मात्र व्यावसायिकांच्या ठराविक कालावधीतच मिळत असते. खुले मैदानावरील न्यायालयाकडील कोपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी देण्यात आला असून त्याठिकाणी लहान उद्यान देखील आहे. पुतळ्यासाठी दिलेली संपूर्ण जागा ५०० चौ. मी. आहे.

स्व.बाळासाहेब ठाकरेंनी केले होते शिवतीर्थाचे उदघाटन
जी.एस.ग्राउंडवर १९९५ मध्ये सभेसाठी शिवतीर्थ या नावाने जि.प.तर्फे व्यासपीठ उभारण्यात आले होते. या व्यासपीठाचे उदघाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. १९९५ नंतर या मैदानावर अनेक सभा, कार्यक्रम आणि मेळावे पार पडले. आजही या जागेवर विविध कार्यक्रम होतात. या पटांगणावर महसूल आणि मनपा प्रशासनाने अवास्तव कर लादल्यामुळे उत्पनापेक्षा कर जास्त अशी अवस्था होऊन बसली आहे. कर परवडेना अशी स्थिती झाल्याने यापुढे हे पटांगण भाड्याने देऊ नये असे स्थायी सभेमध्ये ठरले होते. या पटांगणाला ३ गेट असून दोन मुख्य आणि मोठे प्रवेशद्वार आहेत. काही वर्षांपूर्वीच मैदानाला नवीन संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. (माहिती स्रोत : शामकांत पाटील, सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक)


पहा मैदानाच्या इतिहासाचा खास व्हिडीओ :

 

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.