ऑस्करमध्ये ‘नाटू – नाटू’ची नशा ; गाण्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२३ । यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारताने दोन पुरस्कार पटकावले आहेत आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. पुरस्कारप्राप्त नाटू – नाटू गाण्याची तर या पुरस्कारांमध्ये चांगलीच हवा आहे. या गाण्याचे ऑस्कर पुरस्कार सोहोळ्यात सादरीकरण झाले आणि त्यांना तिथे स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले आहे. या गाण्याच्या काही खास गोष्टी आम्ही सांगणार आहोत.
एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू – नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकून जगभरात भारताचा नावलौकिक वाढवला आहे. ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात या गाण्याला ‘ओरिजिनल सॉन्ग’ श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
तेलुगू गाणे ‘नाटू – नाटू’चे संगीत एमएम किरवाणी यांचे आहे. तर भैरवी आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गाणे गायले आहे. तर रक्षित या गाण्याचा कोरिओग्राफर आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. मूळचे तेलगू भाषेतील हे गाणे आहे. नंतर ते हिंदीसह अनेक भाषांमध्ये डब करण्यात आले.
‘नाटू – नाटू’ गाण्याबाबत काही रंजक गोष्टी
हे गाणं युक्रेनमधील राष्ट्रपती भवनात चित्रीत करण्यात आले आहे. यासाठी युक्रेन सरकारकडून विशेष परवानगी घेण्यात आली होती. गाण्यातील लॉन आणि कारंजे युक्रेनच्या राजवाड्यातील आहे. हे गाणे चित्रित केले गेले तेव्हा युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू नव्हते.
हे गाणे रशियन हल्ला आणि युक्रेनमध्ये सुरू होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी चित्रित केले होते. युक्रेनला जाणे माझ्या बकेट लिस्टमध्ये कधीच नव्हते, पण या गाण्यामुळे ही संधी मिळाली, असे राम चरणने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
या गाण्याचे चित्रीकरण राम चरणने १५ दिवस केले. जवळपास आठवडाभर रिहर्सल केली. आतापर्यंतच्या सर्वात कठीण गाण्यांपैकी हे गाणे असल्याचे राम चरण सांगतो.गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी सांगितले की, गाण्याचे कोरिओग्राफ करण्यासाठी दोन महिने लागले आहेत. गाणे शूट करण्यासाठी २० दिवस लागले आणि ४३ रिटेकमध्ये ते पूर्ण झाले.