जिल्हा बँक निवडणूक : भाजपच्या ‘या’ उमेदवाराची न्यायालयात धाव
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे विराेधात उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाना पाटील, दिलीप पाटील तर अमळनेरमध्ये आमदार अनिल पाटील यांच्याविराेधात अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार स्मिता वाघ आणि भुसावळमधून माजी आमदार संताेष चाैधरी असे एकूण ९ जणांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले हाेते. यापैकी ८ जणांचे अपील फेटाळण्यात आले आहे. दरम्यान, यातील सर्वाधिक उमेदवार हे भाजपशी संबंधित असून, भाजप नेते आमदार गिरीश महाजन हे बाहेर आहेत. ते जिल्ह्यात परतल्यानंतर उमेदवारांनी न्यायालयात जाण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, यातील माधुरी अत्तरदे यांनी मात्र, न्यायालयात धाव घेतली आहे.
सविस्तर असे की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगर आणि अमळनेर साेसायटी मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्ज बाद ठरल्याचे विषय राजकीय औत्सुकत्याचे हाेते. मुक्ताईनगरमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसेंविराेधात उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाना पाटील, दिलीप पाटील, अमळनेरमध्ये आमदार अनिल पाटील यांच्याविराेधात अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे अर्ज बाद ठरल्याने त्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले हाेते. भुसावळमधून माजी आमदार संताेष चाैधरी यांचा अर्ज बाद ठरल्याने त्यांनीही अपील केले हाेते. जिल्हा बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले निर्णय कायम ठेवून ८ जणांचे अपील फेटाळले.
त्यातील मुक्ताईनगरचे उमेदवार न्यायालयात जाणार असल्याचे आधीच भाजपकडून सांगण्यात आले हाेते; परंतु अद्याप पक्षनेतृत्वाचे आदेश नसल्याने या उमेदवारांनी न्यायालयाची पायरी चढलेली नाही. भाजपच्या महिला राखीव प्रवर्गातील उमेदवार माधुरी अत्तरदे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. भाजप नेते आमदार गिरीश महाजन हे बाहेर आहेत. ते जिल्ह्यात परतल्यानंतर उमेदवारांनी न्यायालयात जाण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.