जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । अमळनेरात समता युवक कल्याण केंद्र प्राथमिक विद्या मंदिर येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. “विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व साहित्य पुरविण्याचा उपक्रम आदर्श आहे” असे प्रतिपादन अमळनेर येथील गटशिक्षणाधिकारी एस. पी. चव्हाण यांनी समता युवक कल्याण केंद्र प्राथमिक विद्या मंदिर येथील शालेय साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रमात बोलताना केले.
समता युवक कल्याण केंद्र संचलित प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व स्वच्छ पाणीसुविधा R.O प्लांटचे व विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण देण्याच्या उद्देशाने टीव्ही स्क्रीन या सुविधांचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी सौ. एस पी चव्हाण संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास पाटील हे होते. यावेळी संस्थेचे संचालक किसन पाटील, संचालक रवींद्र शेलार, तुषार बाविस्कर यांचेसह मुख्याध्यापक आशिष पवार, लोण चे सरपंच कैलास पाटील, वि.का. सोसायटी संचालक हिरामण पाटील, निबाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कृउबा संचालक विश्वास पाटील, आदर्श शेतकरी अविनाश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये अध्यक्ष अशोक पाटील यांच्या आधार फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नव उत्साह निर्माण करीत आहे ” असे प्रतिपादन मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी प्रास्ताविकात केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी विविध सुविधा व साहित्य हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पूरक ठरतील असे सांगितले. सूत्रसंचालन गोविंदा महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश शिरसाठ यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .