450 शेतकऱ्यांच्या बैलांसाठी पोळ्यानिमित्त साज वाटप : अभिनव उपक्रमाची सगळीकडे चर्चा
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२४ । शेती हा आपला फक्त परंपरागत व्यवसाय नाही तर त्या बरोबर जोडलेल्या परंपरा आणि संस्कृती आपल्या रक्तात आहेत. त्या संस्कृतीतला बैलपोळा हा अत्यंत महत्वाचा सण आहे. त्यानिमित्ताने आज आपण जो बैलांसाठी साज देत आहोत ती एकप्रकारे बैलांप्रतीची कृतज्ञता आहे. आज यांत्रिकीकरण आलं तरी शेती मातीशी इमान असलेल्या आपल्या सारख्या बळी राजांनी आजही बैल राखून ठेवले आहेत. हीं आपल्या परंपरेची श्रीमंती आहे, ती श्रीमंती राखू या असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
आसोदा येथे तुषार महाजन यांच्या संकल्पनेतून गणपती मित्र मंडळ व विविध कार्यकारी सोसायटी मार्फत आयोजित बैलांना साज वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोदा येथील शैक्षणिक संस्थेचे संचालक किशोर चौधरी हे होते.
पालकमंत्री म्हणाले, एक दोन महिन्याच्या आत आसोदा पाणी पुरवठा योजना कार्यन्वित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून तालुक्याच्या केंद्र बिंदू असलेल्या आसोदा या गावात सुमारे ६९ कोटीं निधीतून सर्वसमावेशक लहान मोठी कामे केली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या ट्रान्सफार्मरसाठी निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही.
सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बळी राजाच्या प्रतिमेचे व बैल जोडीचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री यांचा आकर्षक अशी बैलगाडी भेट देवून सत्कार केला. सर्वच मान्यवरांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बहिणाबाई स्मारकाचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी सांगितले की, मंत्री गुलाबराव पाटील यांनी असोदा गावासाठी भरभरून निधी दिला असून शेतकरी हिताचे कामे मार्गी लावली आहेत. बैलांना साज वाटप कार्यक्रमाचे महत्व विषद करून आसोदावासीय पुन्हा गुलाबराव पाटील यांना मंत्री म्हणून पाहत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन उपशिक्षक दिगंबर महाजन यांनी केले तर आभार तुषार महाजन यांनी मानले.
यांची होती उपस्थिती?
यावेळी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक शाम कोगटा, असोदा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापू महाजन, व्हा. चेअरमन कावेरी भोळे, दुर्गादास भोळे ,दशरथ महाजन, गिरीश भोळे, तुषार महाजन, किशोर चौधरी, देविदास चौधरी ,प्रभाकर चिरमाडे, गजू सावदेकर, सुरेश कोळी, संजीव पाटील मिराबाई कोळी ,मनीषा नारखेडे,अनिल कोळी, भाजापाचे संजय भोळे, शैलेश भोळे, अजय महाजन, जीवन सोनवणे पिंटू कोळी, सुनील पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील विविध संस्था मंडळाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.