⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पंजाबमध्ये राडा : शिवसेनेच्या खलिस्थानविरोधातील मोर्चावर दगडफेक, रस्त्यावर निघाल्या तलवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । पंजाबच्या पतियाला येथे शुक्रवारी शिवसेनेकडून खलिस्थानविरोधातील मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा एका चौकात आल्यावर शिवसेनेकडून खलिस्थान मुर्दाबादच्या घोषणा सुरु असताना शीख समुदायाच्या एका गटाचा मोर्चेकऱ्यांसोबत वाद झाला. वाद वाढल्याने एका गटाने मोर्चावर दगडफेक केली तसेच काहींनी तर चक्क भर रस्त्यावर तलवारी काढल्या. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांना सूचना दिल्या आहे.

पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदी भगवंत मान यांची वर्णी लागली आहे. पंजाबमधील शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हशिष सिंघेला यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खलिस्थान विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. पतियाला शहरात आयोजित या मोर्चावर काहींनी दगडफेक केली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार संघर्षामध्ये काहींनी तलावारीही उपसल्याने वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला होता.

सध्या सोशल मीडियात या वादाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले असून दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. व्हिडीओनुसार काही जण दगडफेक करीत आहे. काही पोलिसांशी चर्चा करीत आहेत तर काही जण घोषणाबाजी करीत वाद करताना दिसून येत आहे. व्हिडिओत एक इसम समाज भवनावरून उभा राहून दगडफेक करताना दिसत आहे. शिवसैनिकांमध्ये आणि शीख तरुणांच्या गटात हा वाद झाला होता. खलिस्थान मुर्दाबादची घोषणाबाजी केल्याने वादाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबाबत माहिती दिली असून, पोलिसांसोबत चर्चा करून सूचना केल्या आहे. परिसरात शांतता असून डीजीपींसोबत चर्चा करून राज्यात शांतता ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पतियालामध्ये झालेला प्रकार दुर्दैवी असून पंजाबमध्ये शांतता आवश्यक असल्याचे भगवंत मान यांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये झालेल्या वादानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यात शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.