भुसावळात आयोजित लोक न्यायालयात 110 खटल्यांचा निपटारा
Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । भुसावळ शहरात आयोजित लोक न्यायालयात 110 खटले निकाली निघाले. त्यापोटी 90 लाख 79 हजार 307 रुपयांची तडजोड रक्कम जमा झाली. यात स्टेट बॅक ऑफ इंडीया भुसावळ शाखेचे 30 दाखलपूर्व खटले निकाली निघाले. यातून सात लाख 25 हजार 391 रुपयांची तर सर्व मिळून 98 लाख चार हजार 698 रुपयांची तडजोड रक्कम वसूल झाली.
भुसावळातील न्यायालयात शनिवारी, 12 लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अ.म.पदवाड यांच्याहस्ते झाले. यावेळी वकील बार संघाचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील यांनी लोक न्यायालयाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर लोक अदालतीस सुरूवात झाली. यावेळी तीन पॅनलची निर्मीती केली होती. यात पहिल्या पॅनलचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश अ.म. पदवाड होते, पंच म्हणून अॅड.प्रिया अडकमोल होत्या. या पॅनलकडे जिल्हा न्यायालयातील तडजोड युक्त खटले ठेवण्यात आले होते.
दुसर्या पॅनलचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश आर.एस.पाजणकर तर पंच म्हणून अॅड.मनिष अहिरे होते. या पॅनलकडे वीज कंपनी, ग्राम पंचायत, बीएसएनएल या विभागातील दाखलपूर्व खटले होते, पैकी स्टेट बॅक ऑफ इंडीया यांच्याकडील 30 दाखलपूर्व खटले निकाली निघाले. या तडजोड खटल्यातून सात लाख 25 हजार 391 रुपयांची वसूली करण्यात आली. तिसर्या पॅनलच्या प्रमुख या सह दिवाणी न्यायाधीश एस.व्ही.जंगमस्वामी तर पंच म्हणून अॅड.सुशील मेढे होते. या पॅनलकडे कनिष्ठ न्यायालयातील सर्व तडजोडीचे खटले ठेवले होते.
सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या लोक अदालतीत तीन हजार 696 खटले ठेवले होते. त्यापैकी 110 खटले निकाली निघाले. यातून 98 लाख 4 हजार 698 रूपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी सहायक अधीक्षक व्ही.टी.तायडे, व्ही.पी.भावसार, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक एस.आर.पाटील, एस.पी.बोदडे, राहुल पाटील, किशोर पिंगाणे, तुषार वानखेडे, विशाल उमाळे, पी.व्ही. पाटील, व्ही.एन. देशागज, चंदन चिमणकर, एम.एस.खरे, एस.डी. पाटील, भूषण चौधरी, एहतेशाम शेख यांनी सहकार्य केले.