खुशखबर..! शिक्षकांसाठी भुसावळमार्गे धावणार ‘एलटीटी-बनारस स्पेशल रेल्वे गाडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२३ । सध्या देशभरात उन्हाळी सुट्या सुरु झाल्याने रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून विशेष उन्हाळी गाड्या चालविल्या जात आहे. यात मध्य रेल्वेकडून देखील अनेक गाड्या सोडल्या जात आहे. अशातच मध्य रेल्वेने शिक्षकांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमधून शिक्षकांना मुंबई ते बनारस प्रवास करता येणार आहे. ही गाडी भुसावळमार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना दिलासा मिळेल.

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकापासून वाराणसीपर्यंत शिक्षक विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना ‘एलटीटी-बनारस स्पेशल’ असे नाव देण्यात आले आहे.

शिक्षक स्पेशल ट्रेन क्रमांक 01101 लोकमान्य टिळक टर्मिनसवरून 02.05.2023 रोजी 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.00 वाजता बनारसला पोहोचेल.
01102 विशेष ट्रेन 03.05.2023 रोजी 18.00 वाजता बनारसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
01103 विशेष ट्रेन 06.06.2023 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 16.00 वाजता बनारसला पोहोचेल.
01104 टीचर स्पेशल ट्रेन 07.06.2023 रोजी 18.00 वाजता बनारसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

गाड्या कुठे थांबणार?
गाड्या थांबवण्याबाबतही माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यानच्या या गाड्या ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छेओकी स्थानकावर थांबतील.

बुकिंग कसे होईल?
ट्रेन क्रमांक 01101 आणि 01104 शिक्षक स्पेशल म्हणून धावतील. या गाड्यांमधील तिकिटांचे बुकिंग 23 एप्रिल रोजी विशेष आरक्षण शुल्क भरून मुंबई सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील नामांकित काउंटरवरूनच करता येईल. तर, ट्रेन क्रमांक 01103 साठी विशेष शुल्कावर बुकिंग 24 एप्रिल रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल. याशिवाय ट्रेनशी संबंधित तपशीलवार माहिती www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अॅपवरून गोळा केली जाऊ शकते. प्रवाशांना कोविड नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.