⁠ 
शनिवार, मे 4, 2024

‘त्या’च्या अंत्यविधीवरून दोन समाजात मतभेद, पोलिसांनी केली मध्यस्थी

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । शहरातील एका व्यक्तीचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. मयताने आंतरजातीय विवाह केला असल्याने त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्यावर कोणत्या समाजातील चालीरीतीनुसार अंत्यसंस्कार करावे यावरून दोन समाज समोरासमोर आले. १५०-१५० जणांच्या जमावसमोर पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर वाद मिटला आणि मृतदेह अंत्यसंस्कारसाठी नेण्यात आला.

शहरातील एका इसमाचा बुधवारी रात्री अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. मयताने आंतरजातीय विवाह केला असल्याने त्याच्यावर कुठल्या समाजातील चालीरीतीप्रमाणे अंत्यसंस्कार करावे यावरून मतभेद सुरू झाले. बघता बघता दोन्ही समाजातील गर्दी जमू लागली. वाद वाढू लागला. मयताचे कुटुंबीय आणि त्याच्या पत्नीच्या कुटुंबातील नातेवाईक दोन्ही आपल्या निर्णयावर ठाम होते. जमाव वाढल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे पथकासह पोहचले. गर्दी मोठी आणि जमाव आक्रमक असल्याने त्यांनी आरसीपीच्या पथकाला बोलविले.

पथक पोहचले उशिरा पण मध्यस्थी यशस्वी
पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी बराच वेळ पथकाची वाट पाहिली पण ते काही वेळेत पोहचले नाही. निरीक्षकांनी दोन्ही समाजातील बाजू समजून घेत त्यात तोडगा काढण्याचा मार्ग सांगत सामोपचाराने अंत्यसंस्कार करण्याचे सुचविले. दोन्ही समाजातील काही समजदार लोकांना ती बाजू पटल्याने ते शांत झाले.

२ पथक आणि जमावासह मृतदेह रवाना
पोलीस निरीक्षकांनी बोलविलेल्या राखीव तुकड्या केव्हाच्या केव्हा पोहचल्या आणि त्या देखील २ आल्यात. पोलीस बंदोबस्तात मृतदेह रुग्णवाहिकेतून मेहरूण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आला. रुग्णवाहिकेच्या मागे जवळपास ५० दुचाकी, शेकडोचा जमाव आणि तगडा बंदोबस्त असल्याने जणू काही झालेच का? असा प्रश सर्वसामान्यांना पडला होता.