जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । जळगाव (Jalgaon) शहरातील आकाशवाणी चौकातील येथील गणपती हॉस्पीटलचे (Ganpati Hospital) संचालक डॉ.शीतल स्वरुपचंद ओसवाल यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. धनादेश अनादरप्रकरणी त्यांना ५० लाखांचा दंड आणि एक वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा न्यायमुर्ती जान्हवी केळवर यांनी सुनावली आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. ओसवाल यांनी अनिल तोताराम शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून गणपती हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशयन म्हणून सेवा देत होते. वर्षानुवर्षे दिलेल्या सेवेपोटी या दांपत्याला वेतनापोटी डॉ. ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश दिले होते. तसेच धनादेश दिल्याबाबत पत्रही दिले होते. त्यातील दहा लाखांचा एक धनादेश वटला होता.
तर अन्य दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. त्यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि धनादेश अनादरप्रकरणी पुरावे सादर केले. त्यानुसार प्रथम वर्ग न्या. जान्हवी केळकर यांच्यासमोर तीनही खटले चालले.
त्यात डॉ.ओसवाल दोषी ठरल्याने तीनही खटल्यात त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिरसाळे यांच्यावतीने ॲड.आर.आर.गिरनारे व ॲड. हेमंत गिरनारे यांनी काम पाहिले.