जळगाव लाईव्ह न्यूज । होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातच पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी वलसाड–दानापूर–वलसाड साप्ताहिक विशेष गाड्यांना मान्यता देण्यात आली आहे. विशेष या गाडीला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, भुसावळ ला थांबा देण्यात आला.

०९०२५ वलसाड–दानापूर ही विशेष गाडी २३ फेब्रुवारी रोजी धावणार आहे, तर ०९०२६ दानापूर–वलसाड ही विशेष गाडी २४ फेब्रुवारी रोजी सुटेल. याशिवाय, मार्चमध्ये ०९०२५ ही गाडी दर सोमवारी म्हणजे ०२, ०९, १६, २३ आणि ३० रोजी धावेल. त्याचप्रमाणे ०९०२६ ही गाडी दर मंगळवारी म्हणजे ०३, १०, १७, २४ आणि ३१ मार्च रोजी प्रवाशांच्या सेवेत राहील.

दरम्यान, धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने वलसाड–दानापूर–वलसाड या गाडीचा धरणगाव थांबा पूर्ववत सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. डीआरयूसीसी (पश्चिम रेल्वे) चे सदस्य महेंद्र कोठारी यांनी प्रवाशांची गैरसोय, वाढती गर्दी आणि या मार्गाचे महत्त्व यांचा सविस्तर उल्लेख निवेदनात करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाकडून या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात आला. आणि अखेर धरणगाव स्थानकावरील वलसाड–दानापूर–वलसाड या गाडीचा थांबा पुनर्स्थापित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

या विशेष गाडीचे प्रमुख थांबे भेस्तान, नंदुरबार, धरणगाव, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर असे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे.










