⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर कट्टर विरोधक फडणवीस- महाजनांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असून येत्या १५ दिवसांत आपला भाजप प्रवेश होणार असल्याचे स्वतः एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राज्यातील विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत असून अशातच त्यांचे कट्टर विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
खडसे यांच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तर त्याला विरोध नाही. मात्र पक्षाने अजून आम्हाला कळविले नाही. पक्षाने कळवले आम्ही त्यांचे स्वागतच करु, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे गिरीश महाजन म्हणाले, खडसेंचा प्रवेश कधी होणार आहे, हे त्यांनाच माहीत आहे. खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे. अमित शाह यांच्याशी आहे, असे ते म्हणतात. एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की, आमची भूमिका तिच राहणार आहे. ते दिल्लीला, जात आहेत, येत आहेत. आता त्यांनी सांगितलंय 15 दिवसांनी प्रवेश घेणार आहे. वाट बघू, एकनाथजी खूप मोठे नेते आहेत. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे ते काम नाही. त्यांचा प्रवेश राज्यात होणार नाही. दिल्लीत त्यांचा प्रवेश होणार आहे. यामुळे त्यांच्याविषयी फार बोलणे संयुक्तीक नाही.