“गावाचा सर्वांगीण विकास हाच खरा विकास” : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जानेवारी 18, 2026 5:49 PM

धरणगाव तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ

New Project 5

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२६ । ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करून मूलभूत गरजांना प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या जीवनात प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडवणे, हाच शासनाच्या विकास धोरणाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

Advertisements

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गावाचा सर्वांगीण विकास झाल्यावरच त्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण होते. ही ओळख अधिक भक्कम करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालये, दर्जेदार रस्ते, स्मशानभूमी, शैक्षणिक व धार्मिक परिसरांचे सुशोभीकरण अशा सर्व मूलभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर शासनाचा सातत्याने भर आहे. ‘गाव तिथे स्मशानभूमी’ हा उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत असून जनसुविधा योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘गाव तिथे स्मशानभूमी’ हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला जात असून जनसुविधा योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हाच आमचा खरा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements

धरणगाव तालुक्यातील श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे या गावांमध्ये सुमारे ८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना यावेळी प्रारंभ करण्यात आला असून अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विवरे–जांभोरे–सार्वे खुर्द ते बिलखेडा या १०.५० कि.मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यावर २७ ठिकाणी पाईप व काँक्रीट मोऱ्या तसेच ४१० मीटरचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून यासाठी ६ कोटी ५२ लक्ष रुपयांचा खर्च होणार आहे. याशिवाय धरणगाव ते सार्वे या १ कि.मी. शेतरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण (४९ लक्ष), श्यामखेडा येथे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शाळा परिसर सुशोभीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवणे (१० लक्ष), बिलखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम (२० लक्ष), भोणे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता तसेच लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात काँक्रीटीकरण व सभागृह बांधकाम (१ कोटी) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

तसेच आमदार निधीतून जांभोरे येथे दोन प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण (२० लक्ष), बिलखेडा येथे महानुभव गल्लीतील रस्त्याचे काँक्रीटीकरण व सांत्वन शेड बांधकाम (२१ लक्ष) तसेच भोणे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता या कामांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी केले, तर आभार माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मानले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now