लाचेची लालच महागात! चाळीसगावच्या उप अभियंत्याला लाखोंची लाच घेताना रंगेहात पकडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढत असून अशातच आणखी एक लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल चार लाख रूपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्याला रंगेहात अटक केली. ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ विसपुते ( वय ५७, रा. अशोक नगर, धुळे ) असे लाचखोराचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?
यातील तक्रारदार यांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग ,ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. या कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्‍वर विसपुते याने तक्रारदाराला पाच लाख रूपयांची मागणी केली होती.

दरम्यान, संबंधीत कंत्राटदाराने या संदर्भात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचून ज्ञानेश्‍वर पंढरीनाथ विसपुते यांना चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना रंगे हाथ अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.