⁠ 
रविवार, मे 5, 2024

कृत्रिम पावसाचा प्रयोग व्हावा, अशी शेतकरी कृती समितीच्या वतीने मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज। १४ ऑगस्ट २०२३। उत्तर महाराष्ट्रात अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग व्हावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्यावतीने शेतकरी कृती समिती समन्वयक एस. बी. पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे शेतकरी व शासनाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. पत्रात नमूद केले, की उत्तर महाराष्ट्रात यावर्षी अडीच महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.

थोडेसे तुषार येतात, त्यामुळे आजमितीस पिके चांगली दिसत असली तरी वाढ समाधानकारक नाही. उत्पन्न कमी होईल. नदी नाले न वाहिल्याने पिण्याच्या पाण्याचा व रब्बीचा प्रश्न निश्चित गंभीर होऊ शकतो. जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या साधारणपणे ३० टक्के ते ३५ टक्केच पाऊस झाला असून, गेल्यावर्षी आजच्या तारखेला जेवढा झाला होता, त्यात २५-३० टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य प्रदेशात झालेल्या पावसाने नद्या वाहताना दिसत असल्या तरी आपल्याकडील नदी-नाले कोरडे आहेत.

हतनूरचे पाणी तापी नदी पात्रातून सरळ वाहून जात आहे. दरवर्षी ते कॅनालमधून नदी-नाले यात सोडले जायचे. त्यामुळे खूप पाणी जमिनीत जिरायचे अजून देखील तसे आदेश झाल्यास चोपडा, यावल, रावेर तालुक्याचा खूप फायदा होईल.
आपण हवामान खाते यांच्या मार्गदर्शनाने पुढील पावसाचा अंदाज घेऊन कार्यवाहीसाठी योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी कृती समिती समन्वयक एस. बी. पाटील यांनी केली आहे.

सध्या वातावरण १०० टक्के ढगाळ आहे व ते सारे पाण्याचे ढग असून, फक्त वातावरणात आर्द्रता तयार होत नसल्याने पावसात रूपांतर होऊ शकत नाही. त्यासाठी शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केल्यास पिके व हंगाम वाचवता येईल. याने शेतकऱ्यांचा फक्त शेतीचाच नाही तर भविष्यातील पिण्याचे पाण्याचे देखील प्रश्न सुटतील व जनतेचे हाल वाचतील व शासनाचे नंतरचे कोट्यवधी रुपये पुढील काळात जर ढग आले नाहीत तर हा प्रयोग करणे देखील शक्य होणार नाही.