जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । हल्ली सोशल मीडियाद्वारे सामान्य नागरिकांना फसवण्याच्या घटना नियमित आपल्या कानावर पडतात. परंतु, आमदारांना ही कुणी फसवू शकते, असेच प्रकरण आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या बाबतीत झाले आहे.
आमदारांचे सोशल मीडियावर भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील या नावाने फेसबुक अकाउंट आहे. बनावट अकाउंट बनवणाऱ्याने याच नावाशी साधर्म्य व सारखेच वाटणारे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार केले. या अकाउंटच्या माध्यमातून तालुक्यातील भरवस, शिरूड व शिरसाळे व इतर गावातील कार्यकर्त्यांना पैशांची मागणी करणारे संदेश पाठवले गेले.
त्यात “मला २० हजार लागणार असून फोन-पे ने पाठवून द्या’ असे संदेश पाठवले होते. कार्यकर्ते सजग असल्याने त्यांनी तत्काळ ही गोष्ट आमदारांच्या कानावर घातली. या संदर्भात आमदारांना अनेक फोन अाल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी सोशल मीडिया हाताळणारे केशवा आयटी व्हिजनचे संचालक गणेश भामरे यांच्याशी तत्काळ संपर्क साधून या प्रकरणावर लक्ष ठेवायला सांगितले.