दीपनगर फुलले : ६८ प्रजातींचे पक्षी, मुकूटधारी वटवट्यांची नोंद
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरात पक्षी अभ्यासक लक्ष्मीकांत नेवे यांच्या माध्यमातून ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान, पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. या पक्षीनिरीक्षणात ६८ प्रजातींची नोंद करण्यात आली. त्यात प्रथमच मुकुट धारी वटवट्याची नोंद झाल्याने निरीक्षकांचा उत्साह वाढला. पक्षी तज्ज्ञ मारुती चितामपल्ली आणि सलीम अली यांच्या वाढदिवसाचे अवचित साधत हा उपक्रम राबवण्यात आला.
निरीक्षणासाठी या जागा निवडण्यात आल्या,
पक्षीनिरीक्षणासाठी परिसरातील मारुती मैदानाजवळील दलदलीचा भाग, चांदणी गार्डन, गणपती मंदिर परिसर, काही निर्जन परिसर अशा जागा निवडण्यात आल्या. दररोजच्या पक्षी निरीक्षणात ३० ते ४० पक्ष्यांची नोंद करून ‘ई बर्ड’ या जागतिक व्यासपिठावर छायाचित्रे, चलचित्रे आणि आवाजांच्या नमुन्यांसह माहिती जमा करण्यात आली. पक्षी निरीक्षणात वेगवेगळ्या पक्षांना जवळून पाहता आले, त्यांचे आवाज ऐकता आले.
या पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली.
कोकिळा, भारद्वाज, हळद्या, पांढऱ्या छातीचा धीवर, चिरक, दयाळ, लालबुड्या बुलबुल, सूर्यपक्षी, करण पोपट, सुतार, शिंपी, नाचण, गोमेट, कवडी रामगंगा, सातभाई, चष्मेवाला, सुभग, धनेश आणि वेडा राघू या नेहमीच्या स्थानिक पक्ष्यांसह राखी डोक्याचा पिवळा माशीमार, लाल कंठाचा आणि लाल छातीचा माशीमार, छोटा शुभ्रकंठी वटवट्या, ब्लीथचा वटवट्या, पिवळ्या पोटाचा वटवट्या, मुकुट धारी वटवट्या या स्थलांतरीत पक्ष्यांनीही उपस्थिती दाखवली. दलदलीच्या भागात जांभळी पाणकोंबडी, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, बगळे, कमळपक्षी, अडई यांची नोंद झाली. मुलांनी कापशी, शिक्रा, मधुबाज हे शिकारी पक्षी देखील पाहिले. मधुबाजला पळवण्यासाठी करण पोपट, पोपट आणि कोतवाल यांनी एकत्र हल्ला करताना मुलांनी बघितले. दीपनगर परिसरात सुमारे ६८ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली. या सप्ताहात मुकुटधारी वटवट्याची प्रथमच छायाचित्रित नोंद झाली. विशेष म्हणजे मुलांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मृदू कवचाच्या कासवाची नोंद
पक्षी निरिक्षण करताना पक्षिप्रेमी परिसरातील जैवविविधतेचे इतर घटक फुलपाखरे, कोळी, मधुमाशा, मुंग्या, झाडे, वेलींचे निरीक्षण करत होती. त्यात शेवटच्या दिवशी मृदु कवचाच्या कासवाची नोंद झाली. पक्ष्यांचे रंग पाहत असताना त्यांचे वागणे, एकमेकांना मदत करणे यासाठी जागेवरच काही चित्रफिती, छायाचित्रे वेळोवेळी दाखवण्यात आली. गरजू पक्षीप्रेमींना महाराष्ट्रातील पक्षी हे छोटी माहिती पुस्तिका भेट देण्यात आली. पक्षी निरीक्षणात सहभागी मुलांसोबत लक्ष्मीकांत नेवे व पदाधिकारी.
यांचा होता सहभाग
पक्षी सप्ताहात लक्ष्मीकांत नेवे, बाबासाहेब जावळे, अपर्णा नेवे, लौकिका नेवे, श्रावणी जावळे, गार्गी कबाडे , फरिन तडवी, आयत तडवी, अनन्या कारवाल, ओंकार मोहितकर, प्रशांत लेनेकर, ऋषभ लेनेकर, सम्यक सोनोने, निकिता फेगडे, सम्मीका वाघमारे, यशश्री वाघमारे, अर्हंत सोनोने, पारमी सोनोने, ज्ञानेश झांबरे, श्रृती बोडले, श्रेयस बोडले, गिरिश बोडले, दिव्यांश कुनघाडकर, नैतिक झांबरे, दीपाली झांबरे, दिनेश कुनघाडकर, गणेश झांबरे आदी पक्षिप्रेमी उपस्थित होते.