यावल

यावल पंचायत समितीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा वादाच्या भोवऱ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । यावल पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा रविवार दि.२४ रोजी होत आहे. तत्पूर्वीच हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता शेखर पाटील यांनी हा कार्यक्रम प्रोटोकॉलनुसार होत नसल्याचा आरोप केला आहे. या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची घाई का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

यावल पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा रविवार दि.२४ रोजी होत असलेला उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका पंचायत समिती प्रशासनाकडून वितरित करण्यात आल्या आहेत. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीश महाजन हे उपस्थित राहणार असल्याचे या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, अरुणा पाटील, सविता भालेराव, नंदा सपकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन आदी उपस्थित राहतील, असे निमंत्रक पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी यांनी कळविले आहे.

प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप
कार्यक्रम पत्रिकेत शासकीय प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी हा कार्यक्रम प्रोटोकॉलनुसार होत नसल्याचा आरोप करून आमदार शिरीष चौधरी यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला असताना प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

स्थानिक आमदारांना डावलले
लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक आमदारांना संधी न देता इतर मतदार संघातील आमदारांना संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकूणच रविवार दि.२४ रोजी होत असलेला हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील याविषयी शंका उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी व्ही.एन. भाटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button