जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । देशात महागाई प्रचंड वाढली असून इंधन, गॅस सिलिंडर, खाद्यतेलाची भाव गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्य होरपळून निघत आहे. अशातच खाद्य तेलाच्या महागाईनं हैराण झालेल्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्यानंतर देशातील बहुतांश तेल कंपन्यांनी तेलाच्या किमतीत प्रति लिटर 15 रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा स्वयंपाकघरातील खर्च काहीसा कमी होणार आहे.
जगभरातील बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती खाली आले. या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाचे प्रमुख उत्पादक असलेल्या अदानी विल्मर, रुची सोया, जेमिनी, मोदो नॅचरल्स, गोकुळ रिफाईंड, विजय सॉल्वेक्स, गोकुळ अॅग्रो आणि एन. के. प्रोटीन या प्रमुख कंपन्यांनी विविध प्रकारच्या खाद्य तेलाच्या किंमतीत कपात केली आहे.
या निर्णयाने पाम तेलाचा भाव ७ ते ८ रुपयांनी कमी झाला आहे. सूर्यफूल तेलाचा भाव १० ते १५ रुपयांनी आणि सोयाबीन तेल ५ ते ८ रुपयांनी स्वस्त झाले असल्याचे इंडियन व्हेजिटेबल ऑईल प्रोड्युसर असोसिएशनचे अध्यक्ष यांनी सांगितले. दरम्यान, नव्या दराचा माल बाजारात येण्यासाठी किमान आठवडभराचा वेळ लागेल.
मागील वर्षभर खाद्य तेलाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. त्याला अनेक कारणे होती. रशिया-युक्रेन युद्ध, मलेशियाकडून पाम तेल निर्यातीवर निर्बंध यासारख्या कारणांमुळे तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या. मात्र मागील आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे भाव कमी झाले. त्याशिवाय भारताला अर्जेंटिना आणि रशियाकडून खाद्य तेलाचा पुरवठा वाढला आहे. या दोन्ही देशांमधून सूर्यफूल तेलाचा जादा पुरवठा होत आहे. ज्यामुळे तेलाचे भाव कमी झाले आहेत.