जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । बोदवड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच पंचनामे न करता सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली.
बोदवड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून पाहणी किंवा पंचनामे न करता सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत घोषित करण्याबाबत महाविकास आघाडीकडे पाठपुरावा करावा, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फ़े खासदार रक्षा खडसे यांना देण्यात आले. संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या.
प्रसंगी आंदोलन करू
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपाच्यावतीने आंदोलन करू, असे आश्वासन खा. खडसे यांनी यावेळी दिले. यावेळी शेतकरी संघटना, भाजपाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.