जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे दि.२ ऑगस्ट रोजी दोन गटात वाद झाला होता. यावेळी झालेल्या हाणामारीत बाळू रायसिंग पाटील वय-७२ हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, जळगावात उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याशिवाय मृताचे शवविच्छेदन करू देणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथील रहिवासी बाळू रायसिंग पाटील यांच्या कुटुंबाचे शेजारीच राहणाऱ्या परिवारासोबत वाद होते. ग्रामपंचायत निवडणुकीपासून या राजकीय वादाला सुरवात होऊन त्यामुळे दोन्ही परिवारात वारंवार भांडण होत होते. जून महिन्यात देखील दोघांमध्ये भांडण होऊन परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दि.२७ जुलै रोजी देखील दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता. दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता दोन्ही परिवारात वाद झाला असता बाळू पाटील यांच्या डोक्याला, छातीला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना एरंडोल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येऊन दि.३ रोजी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. शनिवारी पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, बाळू पाटील यांना मारहाण करणाऱ्या विजय भीमसिंग पाटील, राजेंद्र पाटील, संदीप दिनकर पाटील, रविंद्र बुधा पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू न देण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी जमली असून जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे हे कर्मचाऱ्यांसह पोहचले आहेत.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/995471537950417