जळगाव लाईव्ह न्यूज । महावितरणचे काम करीत असताना एका मजुराचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे घडली. अशोक पुराम असे मयत मजुराचे नाव असून या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सांगलीमधील कुपवाड येथील कंपनीला महावितरणने भारत इलेक्ट्रिक कंपनी विविध कामांचे कंत्राट दिलेले आहे. या कंपनीचे सुपरवायझर हर्षल कदम (रा. खेडी) यांच्या सांगण्यानुसार काही मजूर नशिराबाद येथे महावितरणचे काम करीत होते. बुधवारी सकाळी बाजारपट्टा भागात काम सुरु असताना अशोक तिजू पुराम (वय ३९, रा. सुकडी ता. देवरी जि. गोंदिया, ह. मु. भादली रोड) सिमेंटच्या खांब्यात विद्युतप्रवाह उतरला आणि अशोक पुराम यांना विजेचा जोरदार धक्का बसला व ते खाली पडले.
सोबतच्या मजुरांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यामुळे सोबतच्या मजुरांना धक्का बसला आहे. मयत अशोक पुराम यांच्या कुटुंबियांना गोंदिया येथे कळविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह त्यांच्या गावी सुकडी येथे रवाना झाला आहे. घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.