जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । प्रसूतीनंतर नवजात बालकाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. दवाखान्यात वेळीच उपचार झाले नाही. यामुळे बालक दगावले, असा आरोप करत कारवाई करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे पालकांनी केली आहे. याच डॉक्टरांच्या रुग्णालयात कंपाउंडर रुग्णांची तपासणी व उपचार करत असल्याचीही तक्रार अन् आरोप पालकांनी केला अाहे. दरम्यान, बालकाच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप डॉक्टरांनी फेटाळले आहे. मी बाहेगावी असल्याने या घटनेबाबत मला काहीही माहिती नाही, असे डॉक्टर म्हणाले.
येथील रजा कॉलनीतील रहिवासी शेख सद्दाम शेख नूर मोहंमद यांची पत्नी रविवारी पहाटे तीन वाजता ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली. मात्र, प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाला त्वरित बालरोग तज्ञांकडे नेण्याचे सांगितले. शेख यांनी बाळाला बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रवीण चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तेथील कंपाउंडरने डॉक्टर नसल्याचे शेख यांना सांगितले. यानंतर शेख यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना परिस्थिती सांगितली.
पोलिस कर्मचारी सुरेश मेढे व सचिन घुमालकर हे शेख यांच्या सोबत डॉ. चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. तेव्हा डॉक्टर नव्हते. तेथील कंपाउंडरने पोलिसांसमोर नवजात बालकाची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. सुमारे एक ते दीड तास बालकाला उपचार मिळावा यासाठी शेख सद्दाम व त्यांचे कुटुंबीय फिरत होते. मात्र, वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला अाहे.
याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेख सद्दाम यांनी केली आहे. रात्रीच्यावेळी गोरगरिबांवर उपचार झाले पाहिजेत, त्यासाठी रावेरमध्ये सुविधा असावी.
कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो, घटनेची माहिती नाही या घटनेबाबत बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रवीण चौधरी यांना विचारले असता, रविवारी रात्री मी लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेलो होतो. कंपाउंडरने बालकाची तपासणी केली किंवा नाही हे मला माहीत नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.