⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

चाळीसगावला बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू; चुक कुणाची बिबट्याची की मानवाची?

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ डिसेंबर २०२२ | चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी शिवारातील एका शेतातील ऊसाच्या फडात नुकताच जन्मलेला बिबट्याचा बछडा ३० नोव्हेंबरला आढळून आला होता. त्याच्या जवळ त्याची आई नव्हती. आईच्या भेटीसाठी आसुललेल्या पाच दिवसाच्या बछड्याचा रविवार (४ डिसेंबर) मृत्यू झाला. मादी बिबट्या व बछड्याची भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने सतत तीन दिवस बछड्याला शेतात ठेवले. कॅमेरेही लावले गेले. पण बछड्याची आई चार दिवस परिसरात फिरकली नाही. अखेर त्या बछड्याने प्राण सोडले. बिबट्यांचा मानवी वस्ती जवळ वापर, हल्ले आदी प्रकार वाढले आहेत. यात नेमकी चुक कुणाची बिबट्याची की मानवाची?

जळगाव जिल्ह्यात बिबट्याचे दर्शन अधून मधून होतच असते. विशेषत: चाळीसगाव, जामनेर, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये बिबट्याचा वापर दिसून येतो. बिबट्याच्या हल्ल्यात प्राण्यांचा जीव जाण्याच्या घटनाही अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असतं. महाराष्ट्राच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास यंदा राज्यात १७४ बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद झाली. तसेच मानव-बिबट्या संघर्षामध्ये मृत्युमुखी किंवा जखमी झालेल्या माणसांची संख्याही यंदा गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. विशेष म्हणजे, राज्यात संरक्षित वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा वावर मोठ्या संख्येने आहे. जळगाव जिल्ह्यातही बिबट्यांची संख्या मोठी आहे.

वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर

पुर्वी बिबट्यांची गणना त्यांचे ठसे पाहून वन विभागातर्फे केली जात असे. पण आता बिबट्यांची गणना कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून टिपण्यात आलेल्या छायाचित्रांबरोबरच त्यांची विष्टा तपासून करण्यात येते. यामुळे बिबट्यांची अचूक संख्या कळण्यास मदत होते. मात्र, बिबट्यांची ही गणना केवळ वाघांचा अधिवास असणार्‍या संरक्षित वनक्षेत्रांमध्ये करण्यात येते. वनक्षेत्रांबरोबर शेत जमिनींमध्ये ÷(केळी, ऊस, गावशिवारांजवळील भाग) बिबट्यांचा अधिवास आहे. संरक्षित वनक्षेत्राबाहेर बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक राजेंद्र नन्नवरे यांनी जळगाव लाईव्हसोबत बोलतांना दिली.

बिबट्या मानवी वस्त्यांजवळ का येतोय?

बिबट्या हा प्राणी पूर्वी जंगलांमध्ये राहत होता. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्याचा वावर मानवी वस्त्यांसह शेतशिवारांमध्ये जास्त झाला आहे. याचं कारण म्हणजे, जंगलात शिकार मिळत नाही. हरण, काळवीट अन्य प्राणी कमी झाले आहेत. अशा वेळी शिकारीच्या शोधार्थ बिबटे मानवी वस्त्यांजवळ पोहचले आहेत. परंतू ते मानवासाठी नव्हे! बिबट्याच आवडत खाणे म्हणजे कुत्रे आणि कुत्रे हे मानवीवस्ती जवळ जास्त असतात. त्यामुळेच बिबट्याचा वावर त्या परिसरात अधिक वाढतो. या शिवाय शेतशिवारांमध्ये गायी, म्हशी, बकर्‍या आदी प्राणी देखील असतात. त्यामुळेच बिबट्या मानवी वस्त्या व शेतशिवारांमध्ये दिसून येत आहे. बिबट्या जर मानवी वस्तीत शिरला तर नागरिक त्याला बघण्यासाठी गर्दी करतात आणि त्यामुळे देखील तो हल्ला करू शकतो.

अचानक बिबट्या समोर आला तर काय कराल?

१) बिबट्या जवळ जाऊ नका, बिबट्या स्वतःच रक्षण करण्यासाठी हल्ला करू शकतो.
२) तुम्ही तुमच्या जागेवर स्थिर आणि सावध असाल तर बिबट्या लगेच हल्ला करत नाही.
३) बिबट्या गुरगुर आवाज करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल, मात्र तुम्ही एका जागेवर शांत आणि सावध उभे राहा.