मन झाले सुन्न : तीन वेगवेगळ्या घटनेत चिमुकल्यांचा गेला जीव
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । गुरुवारचा दिवस जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला. वेगवेगळ्या घटनेत तीन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगावच्या चार वर्षीय अशिरा अमीन पटेल या चिमुरडीचा डेंग्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जळगावच्या निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडीत केशव ललित चव्हाण (वय ६) या बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली. केशव एकुलता तर अशिराची आई तीन वर्षांपूर्वीच मरण पावली आहे. दरम्यान, रोझोद्याजवळ अपघातात दोन वर्षीय ओम खेमचंद पाटील हा ठार झाला.
तीन वर्षापूर्वी आईचा तर आता डेंग्यूने घेतला चिमुकलीचा जीव
साकेगाव येथील अशिरा अमीन पटेल या चिमुकलीची गेल्या पाच दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यानंतर तिला भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. बुधवारी रात्री अचानक तिची तब्येत खालावली पुढील उपचारासाठी तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अशिरा हिच्या आईचा तीन वर्षापूर्वी एका घटनेत मृत्यू झाला होता. १२ वर्षाच्या भावासह तिचा आजी-बाबा सांभाळ करीत होते.
विजेच्या धक्क्याने आईसमोरच विझली केशवची प्राणज्योत
यावल तालुक्यातील वनोली येथील मूळ रहिवासी असलेले ललित चव्हाण हे पत्नी दिव्यासह जळगावात राहतात. ललित यांचे बी.जे.मार्केटला दुकान आहे.
गुरुवारी दुपारी ३ वाजता दिव्या या घराच्या गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढायला गेल्या होत्या. तेव्हा मुलगा केशव (वय-६) हा देखील त्यांच्या मागे आला. खेळताना एसीच्या कॉम्प्रेसरमधील विजेच्या धक्क्याने केशव हा जागेवरच कोसळला. घाबरलेल्या दिव्या यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरकडे नेले, मात्र तेथे पोहोचण्याच्या आतच आईच्या मांडीवर त्याची प्राणज्योत मालवली. दिव्या व ललित यांचा केशव हा एकुलता मुलगा होता.
अपघातात गेला २ वर्षीय चिमुकल्याचा बळी
रावेर तालुक्यातील सावखेडा येथे वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ओम खेमचंद पाटील (२ वर्षे ) हा ठार तर त्याचे वडील वडील खेमचंद्र मधुकर पाटील व भाऊ सोहम (१०) हे दोघे जखमी झाले आहेत. ही घटना रोझोदा गावाजवळ गुरुवारी दुपारी घडली आहे. घटनेने सर्वच सुन्न झाले आहेत.