⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

लोहारा सरपंचासह सदस्यांचे जि.प.समोर आमरण उपोषण

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१ । लोहारा ( ता.पाचोरा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या निविदेस कार्यानुदेश देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारपासून येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचासह इतर सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरूवात करून, प्रशासनाचे लक्ष वेधले.

सविस्तर असे की, लोहारा गावातील आरोग्य केंद्राची इमारत जुनी झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून, शासनाने नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी साडेतीन कोटींच्या वर निधी मंजूर केला आहे. या निधीच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन गेल्या वर्षी २० नोव्हेंबरला इमारतीच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानंतर निविदांची प्रक्रिया पूर्ण होऊनही, जि.प.प्रशासनाने संबंधित निविदाधारकास अद्याप कार्यानुदेश दिलेला नाही. त्यामळे आरोग्य केंद्राच्या बांधकामास कार्यादेश देण्याच्या मागणीसाठी लोहारा येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल व इतर सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला जि.प.च्या इतर पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

जिल्हा परिषदेतही लसीकरणाची सुविधा

जिल्ह्यात अनेक नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारपासून जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकासांठी नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने खबरदारी म्हणून पुन्हा जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. येथील लहान गेटमधून येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची व त्याच्या लसीकरणाची नोंद करण्यात येत आहे.