जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । घरफोडी करू अडीच लाख रुपये रोख, पाच ग्रॕॅम सोने, तर दुरुस्तीसाठी घरी आणलेले दोन लाख रुपये किंमतीचे ५० मोबाईल असा सुमारे पाच लाखांचा चोरांनी लंपास केले. चोपडा तालुक्यातील धानोरा येथील विठ्ठल मंदिराच्या खालच्या भागात, २१ रोजी मध्यरात्री भरवस्तीत ही घटना घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

घरी परतल्यावर कळले धानोरा येथील गवंडीकाम करणारे अकबर मिस्तरी यांचे मुस्लिम वस्तीत तीन मजली प्रशस्त घर आहे. २१ रोजी सकाळी ते ऐनपूर (ता.रावेर) येथे परीवारासह लग्नाला गेले होते. २२ रोजी सायंकाळी ते घरी परतले. त्यावेळी चोरीची घटना उघड झाली. चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून आत प्रवेश केला होता. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कपाटे उघडून नासधुस केली. तसेच कपाटात व अन्यत्र ठेवलेले पैसे, कपडे व भिशीचे गोळा झालेले दोन लाख ४० हजार रुपये रोख व मुद्देमाल लांबवला. मिस्तरी यांचा मुलगा जुबेर याचे गावातच मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. दुरुस्तीसाठी काही मोबाईल त्याने घरी आणून ठेवले होते. तेदेखील चोरीला गेले आहेत. याबाबत शेख जुबेर शेख अकबर यांनी लागलीच अडावद पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. घटनास्थळी रविवारी रात्री नऊ वाजता अडावद पोलिस ठाण्याचे जगदीश कोळंबे, योगेश गोसावी यांनी भेट देऊन पाहणी केली. धानोरा गावात भरवस्तीत धाडसी घरफोडी झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेख कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची माहिती चोरट्यांना होती, त्यामुळे चोरटे माहितगार असावेत, असा अंदाज आहे.










