केळी पिकावर कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव ; शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी
जळगाव लाईव्ह न्युज | २५ ऑगस्ट २०२१ | राज्यात केळी पिकाखालील 74 हजार 600 हेक्टर क्षेत्र असून महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, परभणी, सोलापूर, अहमदनगर, सांगली व सातारा जिल्ह्यात केळीची लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीचे पिक घेतले जाते. हेक्टरी 50/60 टन एवढे उत्पादन मिळते. उत्पादनाच्याबाबतीत जळगाव जिल्हा आघाडीवर असला तरी सन 2008 पासून सी.एम.व्ही अर्थात कुकुंबर मोसॅक व्हायरस या रोगाचा प्रसार दरवर्षी वाढत आहे. सन 1943 मध्ये जळगाव जिल्ह्यातच हा रोग प्रथमच आढळून आला होता. स्थानिक भाषेत या रोगास हरण्या रोग म्हणतात. गेल्या वर्षी या रोगाचा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात उद्रेक झाला होता. प्रामुख्याने रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा तालुक्यात हा रोग मोठया प्रमाणात आढळून आला होता.
रोगास कारणीभूत घटक
सतत ढगाळ वातावरण असणे, जुन-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडीत पाऊस, हवेचे कमी तापमान (24 अं.से) वाढलेली आर्द्रता हे घटक रोगास अतिशय पोषक असतात. या रोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत ओळखून त्यावर नियंत्रण करणे अत्यंत महत्वाचे आहे. या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो. या रोगाचा दुय्यम प्रसार मावा या किडीमार्फत होतो. या विषाणूंची जवळ जवळ 1 हजार यजमान पिके आहेत. यात प्रामुख्याने काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगी, मिरची त्याप्रमाणे मोठा केणा, छोटा केणा धोतरा, काहे रिंगणी चिलघोळ, शेंदाड, गाजार गवत यांचा समावेश होतो. तसेच एक पीक घेतल्यानंतर दुसरे पीक त्वरीत घेतले जाते त्यात किमान दोन ते तीन महिन्यांचा विश्रांती कालावधी असावा. तसेच पीक फेरपालट करणे अंत्यत गरजेचे आहे. या गोष्टींचा असलंग केला तरच आपण कुकुंबर मोझॅक विषाणूजन्य रोग नियंत्रणात आणू शकतो.
रोगाची लक्षणे
केळी लागवडीनंतर 2/3 महिन्यात या रोगाची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीस कोवळया पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक तुटक किंवा संपूर्ण पानावर आढळून येतात. एका पानावर ½ पट्टे किंवा पूर्ण पानभर पसरलेले असतात. कालांतराने पानाचा पृष्ठभाग आकसला जातो. त्यांच्या कडा वाकड्या होऊन पानांचा आकार लहान होतो. नविन येणारे पाने आकाराने लहान होतात. पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. पान हाताने दाबल्यास कडकड असा आवाज होतो. पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील ऊती मरतात व पाने फाटतात. नविन येणारे पाने आकाराने लहान होतात. रोगाच्या अतितीव्र अवस्थेत पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडतो. अशी झाडे पक्व अवस्थेपर्यंत टिकाव धरत नाहीत. झाडाची वाढ खुंटते, अशा झाडांची निसवण उशीरा अनियमित होऊन फण्या अत्यंत लहान होतात व फळे विकृत आकाराची होतात. त्यावर पिवळया किंवा काळया रंगाच्या रेषा दिसतात. विक्रीसाठी अशा फळांचा काहीच उपयोग होत नाही. तापमान व पाऊस पाणी यातील बदलामुळे काहीवेळा हि लक्षणे नाहीशी होऊ शकतात.
नियंत्रण
एकदा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावरील नियंत्रणासाठी त्यावर कोणताही ठोस उपाय करता येत नाही. तथापि, त्याचा पुढील प्रसार रोखण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
शेतातील प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून, दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावी. दर 4/5 दिवसांनी बागेचे पुन्हा निरीक्षण करुन रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही वरील प्रमाणे विल्हेवाट लावावी. बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी. केळीत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका या पिकांची लागवड करु नये. बागेभोवती रान कारली, शेंदणी, कटूर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडाचे वेल नष्ट करावेत.
मावा या वाहन किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट 30 ई.सी 20 मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्लु, जी. 2 ग्रॅम किंव इमिडाक्लोप्रीड 17.8 एस.एल 5 मिली या किटकनाकांची 10 ली. पाण्यामध्ये मिसळून बाग पूर्णपणे स्वच्छ करुन फवारणी करावी. गाव पातळीवर एकत्रितरित्या नियंत्रणासाठी स्वतंत्र मोहिम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच प्रयोगाअंती असे दिसून आलेले आहे की, फलोनिकामाइड 7 ग्रॅम + 15 लिटर पाणी यांची फवारणी केली तर मावा किडीचे नियंत्रण करु शकतो.
विषाणूजन्य रोगाचे प्रमाण दरवर्षी वाढत असून केळी उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करणे व केळी पिकावरील विषांणूजन्य रोगांचे नियंत्रण करुन नुकसान टाळणे गरजेचे आहे. असे अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.