नकली पिस्तुलासह हवा करणारा सराईत गुन्हेगार चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात

एप्रिल 30, 2026 3:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सोशल मीडियाच्या माध्यमातून चाळीसगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आणि खोट्या पिस्तुलासह फोटो-व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली एअर गन (नकली पिस्तूल) हस्तगत करण्यात आली असून, पोलिसांनी त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली आहे.

crime gun

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चेतन गोल्हार याने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून काही फोटो आणि व्हिडिओ प्रसारित केले होते. यामध्ये तो हातात पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करताना दिसत होता. ही पोस्ट शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सोशल मीडियावरील या प्रकाराची चाळीसगाव शहर पोलिसांनी त्वरित आणि गांभीर्याने दखल घेतली. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध सुरू केला. मंगळवारी रात्री सापळा रचून पोलिसांनी चेतन गोल्हारला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे असलेले पिस्तूल हे नकली (एअर गन) असल्याचे समोर आले.

केवळ प्रसिद्धीसाठी आणि दहशत माजवण्यासाठी हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२ आणि ११७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now