जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । तांदूळ घेऊन येणारी आयशर गाडी रस्त्यात अडवून एक लाखांची मागितल्याप्रकरणी अमळनेर येथील पत्रकार जयश्री दाभाडे यांच्यासह ८ जणांविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, धुळ्यातील महेश सुरेश वाणी यांच्या मालकीचे तांदळाचे ३४६ कट्टे घेऊन चालक इम्रान फझल हक अन्सारी (वय ३६, रा. खटकी पाडा, अकबर चौक, धुळे) हे धुळ्याहून चोपड्याकडे ८ रोजी सायंकाळी आयशर (क्र.एम.एच. १८, बी. जी. ७४५) या वाहनाने निघाले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी रस्त्यात हे वाहन अडवले व चालक इम्रान फझल हक अन्सारी यांचा भ्रमणध्वनी व गाडीची चावी हिसकावली. आवाज केला तर गाडी खाली फेकून मारून टाकू अशीही धमकी दिली. पत्रकार जयश्री दाभाडे व एक जण दुचाकीवर तेथे आले व तुम्ही विना हप्त्याचे चालतात, तुम्हाला हप्ते द्यावे लागतील, मालकाला फोन लाव व इथे बोलाव, असे सांगू लागले आणि गाडी परत धुळ्याकडे घेऊन जायला सांगितली. लोंढवे येथे गाडी थांबविण्यात आली.
मालक महेश वाणी आल्यानंतर गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपये व पाच हजार रुपये खंडणीची मागणी केली. चालकाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला पत्रकार जयश्री दाभाडे व त्यांच्यासोबत इतर सात जणांवर खंडणी मागणे व खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणे, रस्ता अडवणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली अाहे. या घटनेची तालुक्यात माेठ्या प्रमाणात चर्चा केली जात हाेती.