⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

…म्हणून मुक्ताईनगर, रावेरातील सहा बँकांवर गुन्हे दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२१ । २०१९-२० या वर्षातील केळी फळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न देणाऱ्या रावेर तालुक्यातील चार तर मुक्ताईनगरातील दोन अशा सहा बँकांवर गुन्हे दाखल केले. तालुका कृषी अधिकारी आणि तालुका तक्रार निवारण समितीचे सचिव मयूर भामरे यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हे गुन्हे दाखल केले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी वारंवार निर्देश दिले. तरीही या बँकांनी दुर्लक्ष केले. ११ ऑगस्टला जिल्हा तक्रार निवारण समितीने या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तालुका तक्रार निवारण समितीचे सचिव तथा तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे ६ बँकांवर गुन्हे दाखल केले.

काय म्हटले आहे फिर्यादीत

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत श्री भामरे यांनी म्हटले आहे की, २०१९-२० वर्षात एग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीने केळी पीक विमा काढला होता. मात्र ३७ शेतकऱ्यांची माहिती वेळेत न भरल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खानापूर शाखा, आयसीआयसीआय बँक, रावेर शाखा आणि बँक ऑफ बडोदा, रावेर शाखा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २ केळी उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरतांना चुकीचे महसूल मंडळ पोर्टलवर भरल्यामुळे बँक ऑफ बडोदा, सावदा शाखा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, सावदा शाखा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या सर्व शेतकऱ्यांना मिळून ९१ लाख ८२ हजार १८५ रुपये पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित करण्यात आले असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व बँकांना संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत ३ वेळा विचारणा करण्यात आली आणि मुदतवाढ देऊनही बँकांनी भरपाई दिली नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. एकूण ११ बँकां विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते मात्र अन्य बँकांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची पूर्तता करून दिल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान या दाखल केलेला गुन्हयामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.