जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । जामनेर तालुक्याचे शेवटच्या टोकास गोद्री शिवारात चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. या प्रकाराला अटकाव करणाऱ्या शेतकऱ्यावर गोद्री शिवारात ८ रोजी मध्यरात्री हल्ला झाला. या प्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
गोद्री येथील शेतकरी जगन कोळी हे रात्री शेतात पंप सुरु करण्यासाठी गेले होते. शेताच्या बांधावर नैसर्गिकरीत्या वाढलेले २० फुट उंचीचे चंदनाचे झाड, तस्कर कापत असल्याचा त्यांना आवाज आला. कोळी यांनी तस्करांवर टॉर्चचा प्रकाशझोत टाकला. त्यावेळी तस्करांनी त्यांच्यावर दगडगोट्यांचा मारा सुरू केला. या घटनेत त्यांना मुका मार बसला. जखमी शेतकऱ्याने दोन तस्करांना ओळखले आहे. त्यामुळे तस्करांनी कापलेले चंदनाचे झाड व करवत सोडून पळ काढला. याप्रकरणी पहूर पोलीसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार पहूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी अमीर जाबीर तडवी व रहीम तडवी व अन्य दोन अश्या चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ किरण शिंपी करीत आहे.