जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या धारागीर गावानजीक कोणीतरी माथेफिरूने मे महिन्यातील लागवड असलेले कपाशीचे पीक उपटून कापून फेकून दिले. शेतकऱ्याचे जवळपास एक ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज असून याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.
एरंडोल येथील महेश शालिग्राम काबरा यांचे धारागीर गावालगत असलेल्या अकरा एकर शेतात बागायती कपाशीची लागवड करण्यात आली आहे. धारागीर येथील अभिमान सुभान पाटील यांना निम्मे हिश्याने शेती देण्यात आली आहे. त्यात बागायती कापसाची लागवड करण्यात आली आहे. कपाशीचे पीक तीन महिन्याचे असून झाडांना बहार सुद्धा लागलेला आहे. असे असताना कोणीतरी माथेफिरूने सुमारे दोन एकरातील कपाशी उपटून व कापून फेकून दिली. घटना १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दि.१६ रोजी अभिमन पाटील हे शेतात पीक पाहायला गेले असता त्यांना प्रकार लक्षात आला. याप्रकरणी एरंडोल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.