जळगावातून विमान प्रवास करताना कोविड चाचणीची गरज नाही
जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । राज्यातील कोरोना संसर्ग कमी होऊ लागल्यामुळे आता लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. अशात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणाऱ्या RT-PCR चाचणीमधून प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. जळगावसह राज्यातील इतर कुठल्याही विमान तळावरून मुंबई विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची करण्यात येणारी आरटीपीसीआर चाचणी १ जून पासून बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. मात्र, जळगाव विमान तळावरून सध्या मुंबईची आठवड्यातून दोनच दिवस सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
राज्यात कोरोनाची उद्रेक वाढत असताना मुंबई महापालिका प्रशासनाने राज्यासह देशभरातून कुठूनही विमानाने मुंबई येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक केली होती. यामध्ये जळगाव ते मुंबई विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीचाही समावेश होता. तर मुंबई विमानतळावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे भीती पोटी अनेकजण विमान प्रवास टाळत होते. यामुळे याचा विमानाच्या प्रवाशी संख्येवरही मोठा परिणाम झाला होता.
मात्र,राज्य शासनाने १ जून पासून लॉकडाऊन मधून काहीशी शिथिलता उठविल्याने, मुंबई मनपा प्रशासनानेही विमान तळावरील आरटीपीसीआर चाचणीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून दर बुधवारी व रविवारी मुंबईची सेवा सुरू आहे. तर आता लॉकडाऊन मध्ये काहीशी शिथिलता उठविल्यानंतर आणखी एक दिवस मुंबईची सेवा वाढणार आहे. तर शक्य झाल्यास शनिवारीही मुंबईची विमान सेवा राहणार असल्याचे अखिलेश सिंग यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईची विमानसेवा नियमित झाल्यावर प्रवाशांचाही प्रतिसाद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.