जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । जिल्ह्यात सौम्य, मध्यम व अतिकुपोषित या तीन वर्गीकरणातील ५,५०० बालके आढळून आली आहेत. बालकांना कुपाेषणातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कुपोषित मुलांसाठी ‘खान्देशी मेनू’ देण्याची योजना तयार केली आहे. पाैष्टीक मेनू मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या १५ मे पासून या योजनेला सुरूवात हाेण्याची शक्यता आहे.
काेराेना काळात कुपाेषण वाढल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी कुपोषणावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाभरात केलेल्या सर्वेक्षणातून सॅम, मॅम व अतिकुपोषित अशा तीन वर्गीकरणात तब्बल ५,५०० बालकांची नोंद झाली होती. खान्देशात उत्पादीत केले जाणारे उत्पादन आणि त्या माध्यमातून तयार करण्यात १०० पेक्षा अधिक पदार्थांची पाक कृती तयार करण्यात आली आहे. त्यात कोणत्या पदार्थात जास्त प्रोटीन आहे, कोणता आहार उपयुक्त आहे? यासाठी तज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती पाककृती ठरवून दररोज वेगवेगळे पदार्थ कुपोषित बालकांना दिली जाणार आहे. पाककृतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो शासनाच्या महिला बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. कुपोषित बालके आहे त्या गावांत ग्रामनिधी व पंधराव्या वित्त आयोगाचा पर्याय आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्रोटीनयुक्त पाककृतीचे साहीत्य खरेदी करून ते अंगणवाडी सेविका व मदतनिस यांना देवून ते तयार करून बालकांना दिले जाईल.