⁠ 
रविवार, मे 19, 2024

कोविड-19 व म्युकरमायकोसीस बाधित रुग्णांवर उपचाराबाबत मार्गदर्शनासाठी टास्क फोर्सची पुर्नस्थापना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । कोविड-19 व म्युकर मायकोसीस बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टॉफ यांना या रुग्णांवर योग्य तो औषधोपचार, सल्ला, मार्गदर्शन करणेकरीता टास्क फोर्सची पुर्नस्थापना करण्यात आली असून याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण आढळून येत असून या रुग्णांसाठी उपचार व संभाव्य धोका असणाऱ्या व्यक्तींकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच उपलब्ध करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील दंतरोग तज्ञ, कान, नाक घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, भिषक या व्यक्तींचा सल्ला घेण्यासाठी जिल्ह्यात 40 व्यक्तींच्या टास्क फोर्सची पुर्नस्थापन करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.

या टास्क फोर्समध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील कान, नाक, घसा तज्ञ, सुक्ष्मजीवशास्त्र तज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव यांचेसह जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाचे प्रमुख भिषक, कर्करोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, दंतरोग तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, प्लास्टीक सर्जरी सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट अशा एकूण 40 व्यक्तींचा समावेश आहेत.

टास्क फोर्सचे सदस्य कोविड-19 व म्युकर मायकोसीस बाधित रुग्ण व क्रिटीकल असणाऱ्या रुग्णांसह इतर रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांना आवश्यक तो औषधोपचार करणेसाठी, कोविड बाधित रुगणांची संख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन करतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.