जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांना भुसावळातील मानपूर येथील महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भुसावळ न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर खडसे पिता-कन्येचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील जमिनीच्या खरेदी-विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्याविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात फसवणूक आणि ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. साल २००२ मध्ये तापी-पूर्णा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी मानपूर येथील चमेलाबाई तायडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची जमीन खरेदी करण्यात आली होती.

जमीनमालकांना कारखान्यात नोकरी आणि योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.मात्र, जमीनधारकांना उर्वरित रक्कम न देता आणि प्रत्यक्षात कोणताही साखर कारखाना न उभारता ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर करण्यात आली, असा आरोप तक्रारदारांनी केला होता.
या प्रकरणावर भुसावळ न्यायालयात दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. न्यायालयाने सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि बाजू पडताळून पाहत एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे खडसे कुटुंबियांना या कायदेशीर लढाईत तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “ही जमीन ‘वर्ग-१’ प्रकारातील असून ती महार वतनाची नाही,” असा दावा खडसेंनी केला आहे.
“साल २००२ मध्येच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रेडी रेकनरच्या दराने जमीनमालकांना सर्व पैसे अदा करण्यात आले होते. हे प्रकरण २४ वर्षे जुने असून केवळ राजकीय षडयंत्रातून आणि सत्ताधारी पक्षाच्या दबावापोटी पोलिसांनी मध्यरात्री हा गुन्हा दाखल केला आहे,” असा थेट आरोपही खडसे यांनी केला आहे.








