⁠ 
रविवार, मे 5, 2024

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच ; कापसाचा भाव वाढण्याऐवजी घसरतोय.. आता ‘इतका’ आहे भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२४ । कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी कापसाचे भाव वाढतील, या आशेवर शेतकरी होते. मात्र, निवडणुकीच्या तारखाही निश्चित झाल्या. परंतु, कापूस दरवाढीची चिन्हे दिसत नाहीत. उलट दर वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या दरात वरच्या वर घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

यंदाच्या वर्षी कापसाचे पीक गुलाबी बोंड अळीने खराब केले. त्यातही योग्य दर मिळत नसल्यामुळे नेमके काय करावे, अशी स्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. दरवाढीची प्रतीक्षा करत अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्याप घरातच पडून आहे. साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात बहुतांश शेतकरी कापसाची विक्री करतात. गेल्यावर्षी कापसाचे दर पाच हजारांवरून १२ हजारांपर्यंत गेल्याने यावर्षी कापसाचे दर वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणला नव्हता.

केवळ ७ हजाराच्या आसपास दर
सध्या मिळणारा दर परवडण्याजोगा नसल्याने दरवाढीच्या आशेने कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. कापसाला दोन वर्षापूर्वी उच्चांकी १३ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र, यावर्षी दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. पाच दिवसांमध्ये दर २०० रुपयांनी कमी होऊन कापूस ७,२०० रुपये क्विंटलवर आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा कापूस साठवणुकीकडे कल वाढत आहे. सद्यस्थितीत दरवाढीची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.