⁠ 
बुधवार, मे 8, 2024

केळी पीक विमा योजनेत भ्रष्टाचार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । केळी फळ पीक विमा योजना राबविताना रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक क्षेत्रात केळी बाग लागवड नसताना त्या क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे. तसेच शेतमालकाला डावलून दुसऱ्याच्या नावाने विम्याच्या हप्त्याची रक्कम भरल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. याची विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन परस्पर दुसऱ्याच्या नावाने विमा काढून विम्याची रक्कम लुटणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हवामानावर आधारित केळी फळ पीक विमा योजना दरवर्षी तालुक्यात राबविण्यात येते. शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार कमी अथवा जास्त तापमान, गारपीट, वादळ यामुळे केळीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना फळ एक विम्याचा लाभ देण्यात येतो. मात्र यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झालेला असल्याच्या तक्रारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी विमा कंपनीकडून लाखो रुपये भरपाई दिली जाते. हीच संधी साधून काही दलाल व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वरकमाई करण्याची नामी युक्ती शोधून काढली आहे. ज्या क्षेत्रात केळीची लागवड झालेली नाही अशा क्षेत्रावर केळी विम्याचा लाभ मिळालेला आहे.

एखाद्या क्षेत्राचा विमा काढताना मालक म्हणून संबंधित शेतकऱ्याची सही आवश्यक असते. मात्र यावेळी जोडलेल्या करार पत्रावर बनावट व खोट्या सह्या करून विमा काढून रक्कमा हडप करण्याचा हा प्रकार विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संगनमताने केला असल्याची तक्रार बक्षीपुरचे शेतकरी कांतीलाल विठ्ठल महाजन यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अभोडा शिवारातील गट न १६/२ हे ६ हेक्टर ४१ आर एवढे क्षेत्र रुख्मिणीबाई दिनकर यांच्या नावावर आहे. तर या क्षेत्राचे कुळ म्हणून उखर्डू गबा महाजन यांच्यसह त्यांचे भाऊ आहेत. मूळ मालक रुख्मिणीबाई व कुळ मयत आहेत. असे असताना या क्षेत्रावर लीलाबाई रवींद्र पाटील व प्रकाश मांगू पाटील या नावाने विम्याचा हप्त्याची रक्कम कंपनीकडे भरण्यात अली आहे. रक्कम भरणाऱ्या महिलेला आपण ओळखत नसून नसल्याचे कुळाचे वारसदार कांतीलाल विठ्ठल महाजन व विनोद रघुनाथ महाजन यांनी सांगितले आहे. परस्पर विमा रकमेचा अपहार करणाऱ्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी या दोघांनी केली आहे.