जळगाव विधान परिषद : ‘महायुती’त जागेवरून पेच; मात्र सर्व्हेत प्रतापराव पाटील यांना नगरसेवकांची पसंती

मे 27, 2026 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. संख्याबळाच्या गणितात महायुतीचे स्पष्ट बहुमत दिसत असले, तरी ही जागा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत रस्सीखेच तीव्र झाली आहे.

pratap P

या जागेवर भाजपने आपला पारंपरिक हक्क सांगत नंदकुमार अडवाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, अमोल शिंदे आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.

दुसऱ्या बाजूला, जिल्ह्यातील वाढती संघटनशक्ती पाहता शिवसेनेने (शिंदे गट) ‘तिसऱ्यांदा शिवसेना’ असा नारा देत पूर्ण ताकदीने कंबर कसली आहे. शिवसेनेतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

सर्व्हेत नगरसेवकांचा कल प्रतापराव पाटील यांच्या बाजूने

या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे केवळ नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकेचे नगरसेवकच मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर, एका आघाडीच्या संस्थेने जिल्ह्यातील नगरसेवकांचा कल जाणून घेण्यासाठी एक व्यापक सर्व्हे केला. या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील शिवसेना आणि इतर घटक पक्षांच्या बहुतांश नगरसेवकांनी प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या नावाला उघड पाठिंबा दर्शवला आहे.

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेला आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा चेहरा म्हणून बहुसंख्य नगरसेवकांचा कल प्रतापराव पाटील यांच्याकडेच असल्याचे सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या १२० नगरसेवकांसह जिल्ह्यातील विविध स्थानिक आघाड्या आणि अपक्ष नगरसेवकांनीही प्रतापराव यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे पारडे वरवर पाहता जड आहे. एकूण ४८२ नगरसेवकांमध्ये भाजपचे १७१ आणि शिवसेनेचे १२० नगरसेवक आहेत. तर जळगाव महानगरपालिकेत भाजपचे ४६ आणि शिवसेनेचे २२ नगरसेवक आहेत.

परंतु, या निवडणुकीत खरी गेमचेंजर विविध स्थानिक आघाड्या आणि ५४ अपक्ष नगरसेवकांची मते आहेत. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र जन विकास आघाडी (१५), धरणगाव शहर विकास आघाडी (९), अमळनेर तालुका शहर विकास आघाडी (१२), शहर विकास आघाडी (१०) अशा अनेक आघाड्यांचे मोठे प्राबल्य आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे या सर्व आघाड्यांच्या नेत्यांशी आणि अपक्ष नगरसेवकांशी असलेले वैयक्तिक व सलोख्याचे संबंध पाहता, या सर्व मतांची गोळाबेरीज प्रतापराव पाटील यांच्या बाजूने सहज वळू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) मतेही यात महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे जळगावच्या जागेबाबत महायुतीचे नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories