⁠ 
शनिवार, मे 4, 2024

नागरिकांसाठी मनपाचे गिफ्ट; मालमत्ता करामध्ये महिनाभर १० टक्के सूट

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच मनपाने जळगाव शहरातील नागरिकांना गिफ्ट द्यायचे ठरवले आहे. महापालिकेने यंदाही मालमत्ता कराच्या रकमेत १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या याेजनेसाठी १० दिवसांची मुदत देण्यात येत हाेती; पण यंदा संपूर्ण महिना म्हणजे ३० एप्रिलपर्यंत कराचा भरणा करणाऱ्यांना रकमेत १० टक्के सूट दिली जाईल, अशी माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडून देण्यात आली.

महापालिका क्षेत्रात १ लाख १८ हजार मिळकती आहेत. या मिळकत धारकांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर कराच्या रकमेत सूट मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. प्रशासनाकडूनही १० एप्रिलपर्यंत कराचा भरणा करणाऱ्यांना १० टक्के सूट दिली जात असते; परंतु यंदा मार्च अखेरची कामे लांबल्याने साॅफ्टवेअरमध्ये बदल झालेले नाहीत.

येत्या दाेन दिवसांत नवीन मागणी बिलांची नाेंद झाल्यानंतर साेमवारपासून मालमत्ता कराच्या रकमेत १० टक्के सूट देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान एक एप्रिलपासून चालू वर्षाचे बिल भरणा करण्यासाठी पालिकेत विचारणा केली जात आहे.