⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

दुर्दैवी : कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सावदा येथील कोरोनामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी गेला आहे. तर घरातील सुनेच्या मृत्यूचा व मुलांच्या आजाराचा धसका घेतल्याने वृद्ध आईचेही निधन झाले. मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

सावदा परिसरात कोरोनाचा संसर्ग हा जिल्ह्याच्या अन्य भागांच्या तुलनेत थोडा उशीरा झाला. यानंतर मात्र येथे रूग्णसंख्या झपाट्याने वाढली. तर अनेक रूग्णांचा मृत्यू देखील झाला. मध्यंतरी येथील रूग्णसंख्या खूप कमी झाली होती. मात्र अलीकडे पेशंटची संख्या वाढीस लागली आहे. तर आता कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील वाढू लागली आहे. यातच आता येथील परदेशी कुटुंबातील तिघे जण कोरोनामुळे तर महिला उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.

आधी घरातील संगीता किशोरसिंह परदेशी (वय ४०) यांचा रविवारी (ता. २१), तर सोमवारी (ता. २२) वृद्ध आई कुंवरबाई गणपतसिंह परदेशी (८५) यांचे निधन झाले. त्यानंतर मुलगा किशोरसिंह परदेशी (५४) यांचा बुधवारी (ता. २४) मृत्यू झाला. नियतीचा हा खेळ एवढ्यावरच न थांबता गुरुवारी (ता. २५) पुन्हा याच कुटुंबातील पत्रकार कैलाससिंह परदेशी (५६) यांचा कोविड सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कैलाससिंह परदेशी यांचा जनसंपर्क दांडगा असून दैनिक सामनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कार्यकुशलतेची छाप सोडली होती. तर त्यांचे बंधू किशोर हे देखील एलआयसीमध्ये असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता.कुटुंबावर कोसळलेल्या या पहाडाएवढ्या दुःखाने समाजमनही सुन्न झाले आहे. विविध क्षेत्रांतील अनेकांनी परदेशी कुटुंबीयांना भेटून व फोन करून या दुःखातून त्यांना सावरता यावे, यासाठी धीर दिला.