…तर कामकाज बंद पाडणार ; जळगावातील संतप्त एसटी कर्म-यांचा इशारा
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । देशासह महाराष्टात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असून, लसीकरण हाच त्यावरील प्रभावी उपाय असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, कोरोना साथरोगात प्रवासी सेवा देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे केले आहे. मात्र, गुरूवारी प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर गेलेल्या एसटी कर्मचा-यांना लस मिळणार नाही, असे सांगण्यात आले. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. अखेर संतप्त कर्म-यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत लसीकरणात दिरंगाई केली तर कामकाज बंद पाडणार असा इशारा दिला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एसटी कर्मचाऱ्यांनी लाखाहून अधिक श्रमिकांची वाहतूक केली. अनलॉकमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव कायम असतानाही सामान्य प्रवासी वाहतूक दिली. आता दुसऱ्या लाटेतही सर्व आस्थापना बंद असताना एसटी कर्मचारी सेवा बजावत आहेत. एस.टी. कर्मचाऱ्यांचा आपत्कालीन सेवेत समावेश करण्यात आला असून त्यांना आता ऑक्सिजन सिलिंडर आणण्याचे काम देखील देण्यात आले आहे. यासाठी लसीकरण सक्तीचे करण्यात आले असून जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी एका पत्राच्या माध्यमातून रेडक्रॉस सोसायटीत लसीकरणासाठी जाण्याचे सुचविण्यात आले. दरम्यान, लस न घेतल्यास हजेरी लावली जाणार नसल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार गुरूवारी सकाळी एसटी कर्मचारी लसीकरण केंद्रावर गेले.
पण, त्यांना लस मिळणार नसल्याचे सांगण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. लसीकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचा संताप लक्षात घेऊन विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, सांख्यिकी अधिकारी सुरेश महाजन, कामगार, अधिकारी शिरसाट व आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, नीलेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. संपूर्ण हकीकत जिल्हाधिकारी यांना सांगितली. त्यावर लवकर निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.