अनिष्ठ बाबींविरुद्ध संघर्ष सातत्याने कायम ठेवा : विनायक सावळे
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२२ । महाराष्ट्र अंनिसच्या कामाला फार मोठे व्यापक स्वरूप प्राप्त झालेले असून त्याला जागतिक पातळीवर मान्यता व मागणी मिळालेली आहे. अशा संघटनेमध्ये काम करीत असताना कार्यकर्त्यांनी प्रशिक्षित होऊन समाजामधील मानवतेला घातक आणि अनिष्ठ बाबींविरुद्ध सातत्याने लढा कायम ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक रविवार दि. १२ रोजी नूतन मराठा महाविद्यालय येथे झाली. यावेळी निरीक्षक म्हणून राज्य सरचिटणीस विनायक सावळे उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याने ‘एक व्यक्ती एक पद’ नुसार जिल्हा कार्यकारणीमध्ये अंशतः बदल करण्यात आले.
यामध्ये रिक्त झालेल्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पाचोरा येथील रवींद्र चौधरी यांची तर चौधरी यांच्या जागी रिक्त झालेल्या जिल्हा प्रधान सचिवपदी विश्वजीत चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर विविध शाखांनी त्यांचे अहवाल सादर केले. राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच औरंगाबाद येथे झाली. या बैठकीत घेण्यात आलेले विविध निर्णय व त्यातील माहिती नूतन जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी सांगितली. यावेळी शाखा पातळीवर संघटना चालवण्याबाबत तसेच कार्यकर्त्यांना विविध मुद्द्यांवर निरीक्षक विनायक सावळे यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी आगामी चार महिन्यातील विविध उपक्रम ठरविण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, सात तालुक्यांमध्ये जाहीर व्याख्यान, सर्प प्रबोधन सप्ताह, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन विशेष उपक्रम, किशोरवयीन मुलांसाठी ‘वयात येताना’ उपक्रम आदींविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
आगामी काळात जळगाव जिल्ह्यात विविध प्रकारे उपक्रम घेऊन शाखा वाढीचे तसेच सदस्य वाढीचे प्रयत्न केले जातील, असे मनोगत नूतन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी मांडले. सूत्रसंचालन कल्पना चौधरी यांनी केले.
बैठकीसाठी जिल्हा प्रधान सचिव मोहन मेंढे, सुनील वाघमोडे यांच्यासह १० शाखांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराध्यक्ष दिलीप भारंबे, कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर, शहर कार्यवाह गुरुप्रसाद पाटील, ॲड. कुणाल बिऱ्हाडे, मुकुंदा सपकाळे, शिरीष चौधरी, ॲड.भरत गुजर, विजय लुल्हे, मीनाक्षी चौधरी, विकास निकम, हेमांगी टोकेकर, देविदास सोनवणे, रत्ना सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.