⁠ 
रविवार, मे 5, 2024

सेनेत गटबाजी नाही उलट भाजपचे १० नगरसेवक संपर्कात : सुनील महाजन यांचा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । भाजपातून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांच्या घरवापसीचा प्रश्नच नसून उलटपक्षी भाजपचे आणखी ८ ते १० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. काही नगरसेवक एकनाथराव खडसेंच्या तर काही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संपर्कात आहेत. सर्वांच्या एकमतानंतर त्यांच्या प्रवेशाचे निश्चित करता येईल असा गौप्यस्फोट मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्याशी बंदद्वार चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसेच भेट केवळ हुडकोच्या कर्जपोटी असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनील महाजन पुढे म्हणाले की, जळगाव महापालिकेवर असलेले हुडकोचे कर्ज पूर्णतः माफ झाले नसून कर्जाच्या रकमेपोटी मनपाला दरमहा ३ कोटी रुपयांचा भरणा करावा लागत आहे. अद्याप ७१ कोटी रुपये देणे बाकी असून शासनाच्या माध्यमातून ते माफ झाल्यास त्यातून शहराच्या विकास कामांसाठी फायदा होईल. एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीचे व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते असून अर्थमंत्री राष्ट्रवादीचे आहेत. 

कर्जाची रक्कम माफ होण्यासाठी आज एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. शिवसेनेत कोणतीही गटबाजी नसून शिवसेनेत आलेला प्रत्येक व्यक्ती हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा असतो. एकनाथराव खडसेंची मी नेहमी भेट घेत असतो. 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून प्रत्येक विभाग वेगवेगळ्या पक्षाकडे आहे त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्कमंत्री संजय सावंत, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून शासनाकडे वेगवेगळ्या कामांसाठी पाठपुरावा करत असतो असे सुनील महाजन यांनी सांगितले.