जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२४ । उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे सर्वच रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे आरक्षित डब्यांनाही जनरलचे स्वरूप प्राप्त झाले असून, त्यातून प्रवाशांमध्ये वादावादी होत आहे. काही प्रवासी विनातिकीट तर काही जण वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यात बसून प्रवास करत आहे. यामुळे आरक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा प्रवाशांकडून १३९ क्रमांकावर तक्रारींची संख्या वाढली आहे.
सध्या उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे रेल्वे विभागाकडून स्लीपर डब्यांची संख्या घटवून एसी डब्यांची संख्या वाढवली आहे. यामुळे जनरल डब्यांची संख्या फार कमी झाली आहे. जनरल डब्यांची संख्या घटल्याने आणि एसी डब्यांचे भाडे परवडणारे नसल्याने थेट आरक्षित डब्यातच प्रवासी घुसत असल्यामुळे या डब्यांना जनरलचे स्वरूप आले आहे. सायंकाळी नाशिककडे जाणाऱ्या भुसावळ-देवळाली पॅसेंजरमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. पवन एक्स्प्रेस सायंकाळी जळगाव स्थानकावर येण्यापूर्वी आरपीएफ कार्यालयातील फोन खणखणला.
एस-२मध्ये भयंकर गर्दी आहे, बाथरूमलाही जाऊ दिले जात नाही, अशी एका प्रवाशाने तक्रार केली. काही मिनिटात ही गाडी जळगाव स्थानकावर येताच, प्रत्येक बोगीत गर्दी होती. अक्षरशः आरक्षित डब्यांच्या दरवाजाजवळ नागरिक लटकलेले होते. रेल्वे थांबल्यावर आरपीएफनी गर्दी कमी केली