जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या मोजमापासाठी लागणारी भुईकाट्यावरील काटा फी मोफत करण्यात आली आहे. बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार असल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या शेतीमाल मोजणीसाठी यापूर्वी चाळीसगाव बाजार समितीतील भुईकाट्यावर काटा फी आकारली जात होती. माथाडी बोर्ड व जिल्हाधिकारी तसेच सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी ठरवून दिलेले तोलाई दर ४.९० पैसे तर अतिरिक्त ३० रूपये आकारणे अन्यायकारक ठरत होती. याबाबत बाजार समितीच्या प्रशासक मंडळाने ठराव करून मंजूर आदर्श उपविधीत दुरुस्ती करत शेतकऱ्यांच्या शेतीमाल मोजमापासाठी लागणारी भुईकाट्यावरील काटा फी मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वजन काटा हमाल व तोलाई दर संघास हस्तांतरित करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे भुईकाट्यावरील काटा फिच्या माध्यमातून बाजार समितीला मिळणाऱ्या सहा लाख रुपयांच्या उत्पन्नाला फटका बसणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आल्याचे प्रशासक दिनेश पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शेतीमाल विक्री खर्चात कपात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयासाठी सहकारातील ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.